Saturday 27 July 2013

आमची फौजदारनिष्ठा

रोजच्या धावपळीत दिवस  कसा उडून जात होता हे कळतच नव्हते , दिस येतील दिस जातील  या चाली वर दिवस, महिने, वर्षे भरभर  सरत जातात परंतु सक्तीच्या विश्रातीच्या वेळी, वेळ जाता जात नाही. आणि अश्या वेळी आइनस्टाईनचा सापेक्षवादाचा अर्थ पटकन समजतो.   वेळ जात  नव्हता    म्हणून    जुनी पुस्तके बघायला घेतली , चाळता चाळता श्री पु ग सहस्रेबुध्देचं  " माझे चिंतन "  हे पुस्तक हाती लागलं  हे  निबंध  संग्रहाचे पुस्तक १९५५ सालचं आहे. ह्या निबंध लेखना मागची भूमिका विषद  करताना लेखक म्हणतात  " आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास  करताना त्यातील अनेक उणीवा ध्यानात    येतात अश्या काही उणीवा समाजाला, विध्यार्थ्यांना , विचारवंताना दाखवाव्यात,  त्याचे मूळ कारण शोधावे , उपाय चिंतन करावे आणि त्या विषयी  सर्वागीण अभ्यास करून मग त्या   विषयावर  लेख  लिहावा"   दहा निबंधाचा संग्रह   असून त्यात  दाखवलेल्या  उणीवा आजही आपल्या समाजात प्रकर्षाने जाणवतात आणि  वाटते कि उपाय  माहिती असून अंमलबजावणीची  इच्छाशक्तीच  आपण हरवून बसलो  नाहीना?  

आमची फौजदारनिष्ठा या   लेखाच्या सुरवातीला वेदांतातील एक गोष्ट  सांगतात , एका गुरूने शिष्याच्या हाती एक पक्षी दिला व जेथे तुला कोणी पाहात नाही अशा ठिकाणी याला मारून टाक !   असे त्याला सांगितले. हे काम फार सोपे आहे असे वाटून, शिष्य अरण्यात गेला जेथे सूर्यकिरण   येत नव्हते अश्या गर्द झाडीत गेला. तेव्हा कोणी पाहात नाही अशी  खात्री  वाटून पक्षाची मान  मुरगळणारं, तोच  त्याच्या लक्षात आले कि  हे कृत्य  कोणी   पाहात नाही असे कसे म्हणता येईल? मी स्वत: ते पाहात आहेच कि ! त्याच्या लक्षात आले कि हे अशक्य आहे. तसाच परत गेला व गुरुजीला सांगितले.  आपला आत्मा प्रत्येक ठिकाणी आपल्या कृत्याचा साक्षी  आहे. हा विचार  शिष्याच्या  ध्यानी आलेला पाहून गुरुजींना आनंद झाला.
आपण सार्वजनिक , ऐहिक जीवनात नियम , नैतिकता पाळतो याचं कारण " आपल्याला   कोणी पाहात नाहीना?  फौजदार आपल्याला पकडणार नाहीना? या मुळे हे सगळे व्यवहार आपण फौजदार   निष्ठेने पार पाडत असतो. आपल्या नीतीचा रक्षणकर्ता पोलिस आहे.  आपण स्वत: जर आपल्या नीतीचे , न्यायचे  रक्षणकर्ते   असू तर आपण समाजहिताचे , संस्कृतीचे  धर्माचे नीतीचे   दंडक  मोडणार  नाही. समाजविघातक कृते  करणार नाही.  आपण आत्म्याला, विवेकाला  पोलीसापेक्षा  श्रेष्ठ मानू.   सध्या आपण पोलीस शिपायाला स्वत: पेक्षा श्रेष्ठ मानतो.    भितो त्या ऐवजी स्वत:ला  श्रेष्ठ मानून  आपण  आपल्याला अधिक भिऊ लागलो तर ? म्हणजेच  नीतीमत्तेचे मापदंड आपण स्वत:च अंतरात्म्याला साक्षी ठेवून पाळू लागलो तर!!!
विश्वाविरुध्द या निबंधात म्हणतात " आपल्या मतासाठी मृत्यू पत्कारावयाचा हि संस्कृती  सॉक्रेटिस ने प्रथम या जगात आणली. "  विवेकनिष्ठा - विवेकासाठी आत्मबलिदान करण्याइतकी  उत्कट निष्ठा हि समजाच्या उन्नतीस अवश्य असलेली अशी प्रेरक शक्ती आहे. या उलट आपण  आपलं वेगळे मत  मांडत  नाही.  आपण इष्ट ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार  या वृत्ती  मुळे  समाजही    मागे जात असतो.
 
समृद्धीचा शाप या निबंधात म्हणतात " संपत्तीचा धनी असूनही मनुष्य इंद्रियांचा (वासनांचा) धनी नसेल, तो चारित्र्य संपन्न नसेल तर, चारित्र्यहिनते मुळे , इद्रीयांवर  त्याची  हुकमत  नसल्यामुळे,  तो ऐश्वर्या   पासून भ्रष्ट होतो.
सार्वजनिक व वयक्तिक जीवनात मार्गदर्शक ठरणारे विचार या छोटेखानी  पुस्तकात पदोपदी आढळतात.