Saturday 14 September 2019

छोडो यार !!

एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवण्याने  आपण खंबीर आहोत असं वाटतं. पण कधीतरी गोष्ट सोडून देणं  शहाणपण ठरतं. 

आपल्यापैकी बहुतेकांना   काही गोष्टी सोडून देणं खूप अवघड जाते. एखादी गोष्ट नाही जमली, एकत्र काम करणं जमलं नाही तर त्याचा खेद करतो. आपल्याला शिकवलं गेले आहे की कितीही कठीण परिस्थितीत घेतलेले काम सोडू नका, हार मानू नका. परंतु ह्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. अपूर्ण कामं  ताण तणाव निर्माण करतात .  अपराधीपणाची भावना जागृत होते आणि त्याचा भविष्यातील  कामावर विपरीत परिणाम होतो. 
ज्या  गोष्टींना आपण खूप महत्व देतो, जी  मूल्य जगण्याचा  मार्ग होतात तीच खूप जाचक ठरतात.

उद्दिष्ट,ध्येय ठरवणं आणि गाठण्यासाठी अहोरात्र ध्यास घेणे उत्तमच. परंतु जीवनाच्या प्रवासात काही उद्दिष्ट , ध्येय कालबाह्य होतात अश्यांचा विचार करणे फेर आढावा घेणे आवश्यक असते.  
खूपवेळा प्रयत्न करून , मनासारख्या गोष्टी घडत नाहीत , परत परत काहीतरी राहून जातं अश्यावेळी जसं आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. 
अश्या वेळी सोडून  देऊन पुढे गेलं पाहिजे. 
तुम्हाला सहज काही गोष्टी सोडून देता येतात का ?  जर तुम्ही हट्टीपणे ,दुराग्रहाने पाठपुरावा करत राहात असाल तर दुस-या संधी धूसर होतात .   वेळीच गोष्टी सोडून देता आल्या नाहीतर दु:ख च देतात .
जुनी ध्येय , धोरण , माणसं पुन्हा पुन्हा काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत.  
एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे  पराभव नव्हे. 
सोडून देणे  म्हणजे पराभवाची खूणगाठ नव्हे. 
सोडून दिले  म्हणजे उपयोगाचं राहिलं  नसावं.   
सोडून दिले म्हणजे सर्व प्रयत्न करूनही इच्छित फळ मिळत नसावं. 
सोडून देणे म्हणजे अधिक चांगल्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे.  
सोडून देण्याने अधिक चपळता, लवचिकता बाणू शकते. 
सोडून दिल्या मुळे नवीन संधी मिळू शकतील.  
बऱ्याच प्रकरणात सोडून देण्याने नवीन  उत्तम  पर्याय उपलब्ध होतात, नवीन ध्येय,माणसं जोडली जातात जी पुढे जाण्यात मदतगार होतात. 
सोडून दिल्या मुळे धक्क्याची तीव्रता कमी होते, मानसिकता अधिक लवचिक होते. 
बघा 
आतातरी  काही काही गोष्टी सोडणं इष्ट  वाटतं ना ! की आव्हानं !!!
(इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर ,त्रुटी अर्थातच माझ्या )

Tuesday 3 September 2019

उघड्या डोळ्यांनी केलेली साधना

गुलजार साहेबची  पुस्तकां विषयी  "किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से" ही एक सुंदर कविता आहे. त्यामध्ये पुस्तकां मुळे  नाती कशी बनतात ह्याचं वर्णन आहे. पुस्तकं देण्या घेण्याने नाती निर्माण होतात. अश्याच नात्यांचा , प्रेमाचा अनुभव नुकताच घेतला. पुस्तकं आपलं जीवन घडवतात , सुमृद्ध करतात , अर्थ देऊन जीवन अर्थपूर्ण करण्यात साह्यभूत होत असतात. आणि पुस्तकं देणारे हात !! ते देतात आकार , दिशा आणि व्हिजन.
अनेक  जेष्ठ श्रेष्ठ सहृदयी मित्रांनी  छान  पुस्तकांशी दुर्मिळ योग जुळवून आणला  .






 त्यातील एक  पुस्तक "तिसरा नेत्र "  श्री शुभ विलास दास यांच्या Open Eyed Meditation  (उघड्या डोळ्यांनी केलेली साधना ) या मूळ पुस्तकाचं भाषांतर आपल्या जीवनातील दैनंदिनी घटनांचा रामायण आणि  महाभारतातील  शिकवणीद्वारे धुंडाळलेला अर्थ.

साधना, चिंतन म्हणजे अंतर्चक्षूंनी पाहिलेलं सत्य, म्हणून " तिसरा नेत्र ".


 


















दैनंदिन व्यवहारात आपण कसं वागायला पाहिजे, काय दक्षता घ्यायला हवी. हे रामायण महाभारतातील छोट्या छोट्या उदाहरणांनी समजून सांगितले अहे. 
सद्यस्थितीतील   संपर्कक्षेत्रांच्या बाहेर जाण्याच्या भीतीवर एक प्रकरण आहे. लेखक  म्हणतात लोक आजकाल फेसबुक ,ट्विटर ,व्हाट्सअँप , मोबाईल इत्यादींद्वारे सतत कनेक्टेड , ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करीत असतात. थोडावेळ मोबाईल पहिला नाही तर  चुटपुट लागते. मला सर्व विसरल्याची भीती सतावत राहते. लोकांना चोवीस तास संपर्कक्षेत्रात राहण्याचा नाद जडला आहे. तथापि व्यक्तिगत प्रगतीसाठी एकांताची आवश्यकता असते. हे प्रभू रामाचं उदाहरण देऊन सांगतात.
 नेतृत्वाची कला , उपाधिरहित नेतृत्व , चिर नेतृत्व, अनिश्चितता आणि नेतृत्व इत्यादी प्रकरणातून नेतृत्व गुणा विषयी प्रतिपादन करतात. एका ठिकाणी म्हणतात.  " ज्यावेळी  नेता , लोकांनुसार किंवा  परिस्थितीनुसार   आपल्यात  बदल घडवून आणत नाही त्यावेळी ते नेतृत्व करण्यामध्ये आणि भावी नेते निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरते."

नातेसंबंध , मैत्री या विषयावर संबंधांचा योग , खरे प्रेम , चिरकाल मैत्री मैत्रिसूत्र , आवडते नावडते इत्यादी प्रकरणे आहेत.
 प्रेमाचे खरे स्वरूप म्हणजे  आपल्या इच्छा , आकांक्षा  एषोआराम यांचा त्याग करण्याची मनोवृत्ती.
 

आपल्या रोजच्या व्यवहारातील शंका , चांगलं काय वाईट काय या विषयी द्विधा असे अनेक विषय ह्या पुस्तकात हाताळले आहेत. जगणं अधिक प्रगल्भ करण्यास मदत करेल असं पुस्तक.