Friday 17 June 2022

जगदगुरु  आदी शंकराचार्य जन्मभूमी - कालडी.  


कालडी - केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्हा मधील कोची विभागातील पूर्णा नदीच्या किनारी वसलेले निसर्गसुंदर गाव. जगदगुरु श्री शंकराचार्य यांचे जन्मस्थान. हिंदू धर्म, संस्कृती शिकवण , अद्वैत विचारसरणीचे प्रेरणास्थान. विचार , शब्द , कृती शुद्ध करणारे एक पवित्र तीर्थ . ज्ञान , विज्ञान , आत्मसंयम इत्यादी गुणांचे स्फुरण करणारे ठिकाण. 

  

आदी शंकराचार्य जन्मभूमी प्रवेशद्वार , कालडी

आदी शंकर जन्मभूमी क्षेत्र, श्रुंगेरी श्री शारदापीठा अंतर्गत येते. या क्षेत्रांत 

श्री शक्ती गणपती , 
श्री शारदांबा 
आदी शंकर    मंदिरं 
आणि 
श्री शंकराचार्याच्या मातोश्री आर्यम्बाची समाधी आहे. 

मठाच्या मुख्य इमारती शेजारी श्री शंकराचार्यांचे कुलदैवत श्री कृष्णाचे मंदिर आहे. 

                                                  आदी शंकर जन्मभूमी क्षेत्र



आदी शंकराचार्य जन्मभूमी मंदिर ,मठ






श्री शक्ती गणपती ,

श्री शक्ती विनायक मंदिर : जीवनात सगळ्या प्रकाराने शक्ती प्रदान करणारा  कृष्णाशिलावर विराजमान झालेला विनायक,गणपती.  


शारदांबा मंदिर :   या मंदिराची निर्मिती षट्चक्राच्या आधारवर षटकोणाकारात झाली आहे. श्री शारदा (ब्राह्मी ) ची मूर्ती दक्षिणाभिमुख विद्यमान आहे. शुक , अमृतकलश , जपमाला , पुस्तक या चार वस्तू धारण केलेली सरस्वती . 

ब्राह्मी , माहेश्वरी , कौमारी , वैष्णवी , वाराही , इंद्राणी , चामुंडा  ह्या सप्त मातां मध्ये सरस्वतीला मुख्य मूर्तीच्या रूपात प्रतिष्ठित केलं आहे. 







श्री आदि शंकराची आई आर्यंबावर  या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.







या समाधीजवळच काळ्या
 पाषाणाचा दीपस्तंभ श्रीशंकराच्या काळापासून अस्तित्वात  आहे

                                                                        आदी शंकराचार्य मंदिर.              बाजूलाच वेद भगवान  

श्री आदी शंकराचार्य मंदिर : आचार्य शंकराचे मंदिर षोडश कोणाकारात  बनवले आहे जे जीवात्मा आणि षोडश कलाचे  द्योतक आहे. आचार्य पूज्यपादची प्रतिमा दक्षिणामूर्तीच्या रूपात स्थापित झालेला आहे. मृत्यू भयापासून   मुक्त करणारा दक्षिणामूर्ती 

            कुलदैवत    श्री कृष्ण मंदिर 
                                 
श्री कृष्ण मंदिर : आदी शंकरानी श्री कृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. अस्मद कुलदैवतम  नावाने श्री कृष्णाचे स्तवन केले आहे



श्री कृष्ण मंदिर गाभारा     



     
          

आदी शंकराचार्य कीर्ती स्तंभ :   श्री शंकराचार्य यांच्या जीवनातील ठळक घटनांचे  शिल्पचित्र   या आठ माळ्याच्या स्तंभाच्या आतील भागात चित्रित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर श्री शंकराचार्याला पूजनीय असलेल्या देवतांच्या सुंदर मूर्ती आहेत. 








                           श्री शंकराचार्य संक्षिप्त जीवनपट 


आदी शंकराचार्य जीवन आणि कार्य  

भारतीय इतिहासाच्या कालनिर्णयाची समग्र आणि समाधानकारक चिकित्सा झाली नसल्याने  (माक्स म्यूलर व , ए.बी. कीथ ) यांनी आद्य शंकराचार्यांचा जीवनकाल इ.स.७८८ ते ८२० असा निर्धारित केला असून यास सर्वसाधारणपणे मान्यता देण्यात येते. शंकराचा जन्म केरळातील पूर्णानदीच्या काठी कालडी गावी नंबुद्री ब्राह्माण कुळात झाला. 

शांकरविजय  ग्रंथातील वर्णनावरून  

“अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद ! 

               षोडशे कृतवान भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात !!” .

म्हणजेच आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तिसाव्या वर्षी महाप्रस्थान. असा जीवनपट उलगडतो. 

  

आचार्य परिव्राजक म्हणजे भारतभर पदयात्रा करणारे होते.  वादविवादात त्यावेळच्या पंडित, ज्ञानी ,  विद्वान  लोकांना त्यांनी जिंकलं  होतं. आचार्य समन्वयवादी होते. समन्वय साधण्यासाठीच त्यांनी वाद विवाद केले. निर्गुणवादी असूनही त्यांनी शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार्य या सहा हिंदू पंथीयांत समन्वय करण्यासाठी पंचायतन पूजेची सुरवात केली शंकर,नारायण,रवी , गणपती आणि देवी या पाच देवांनां एकत्र बसवले. आचार्यांनी देवतांना एकत्र बसवून सर्व पंथ एकत्र आणले. भारतात चार दिशांना चार आश्रम   स्थापन करून धार्मिक, सांस्कृतिक एकात्मता दृढ केली. 

समाजात परिवर्तन करण्यासाठी मनाला आवाहन करतात परंतु शंकराचार्यांनी बुद्धीला आवाहन केलं. ते गावोगावी फिरले. वर्षानुवर्षे सतत फिरत राहिले. लोकांपर्यंत पोचून विचार समजावत राहिले. हृदय परिवर्तनाची एक प्रक्रिया शंकराचार्यांनी शोधून काढली. भारत भ्रमण करताना जेथे कुठे धार्मिक आणि गुणवान लोक भेटतील तेथे त्यांच्याशी धर्म चर्चा करून त्यांचे विचार बदलून त्यांच्याद्वारे धर्म प्रचार करणे ही होती आचार्यांची हृदय-परिवर्तनाची प्रक्रिया. लोकांत निष्ठा निर्माण करणे हे आचार्यांचे उद्दिष्ट होते. आचार्य म्हणत आपल्याला केवळ समजावून सांगण्याचा अधिकार आहे. आमचे काम आहे लोकांना विचार देणे. लोक विचार करू लागतील ते त्यांना स्वस्थ बसू देणार नाहीत. ही आहे शांकर प्रक्रिया. हिंदू धर्मात विचार स्वातंत्र्य, बुद्धी-स्वातंत्र्य टिकले वाढले हे शंकराचार्यांचे कार्य आहे. त्यांचं एक वाक्य आहे शंभर वेद जरी सांगू लागले की अग्नी उष्ण नसतो तरी कोणी ते मानणार नाही. कारण हा विज्ञानाचा, प्रत्यक्षाचा विषय आहे. यात वेद-विरोध , धर्म-विरोध नाही 

प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रहमसूत्र , उपनिषद , व भगवद गीता यावर आचार्यांनी भाष्य केली. विवेकचूडामणी, स्तोत्रं, प्रकरण ग्रंथ इत्यादी  अनेक ग्रंथ लिहले,  शंकराचार्यांच्या विचाराचा , जीवनाचा प्रभाव आज १२०० वर्षानंतर भारतभर टिकून आहे. संशयाकूल समाजाला विचारनिष्ठ बनविले. कर्माविना चित्तशुद्धी नाही, चित्तशुद्धिविना ज्ञान नाही हे त्यांचे निश्चित मत आहे. शंकराचार्यांनी धर्मश्रद्धा बुद्धियुक्त बनवली रामकृष्ण परमहंस , रमणमहर्षी. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सर्वांचा विचार म्हणजेच शांकर विचार होय. 

शंकराचार्यांनी मायावादाला तात्त्विक रूप दिले. ज्याला सत्य ही म्हणता येणार नाही आणि असत्य ही म्हणता येणार नाही ते मायेचं रूप.  

आचार्य अद्वैतवादी होते. त्यांचं म्हणणं होतं  

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ।’ 

म्हणजे ‘ब्रह्म हेच सत्य आहे, जगत् मिथ्या आहे. जीव हा ब्रह्मच आहे, तो ब्रह्माहून निराळा नाही.’शांकरविचार म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणजे प्रेमाची परिसीमा. आचार्य म्हणतात "देवा , तुझ्या माझ्यात भेद नाही"

लोकचित्तावर जितका शब्दाचा परिणाम होतो त्यापेक्षा पुष्कळ अधिक परिणाम जीवनाचा होतो. आचार्य समजून घेताना,आचार्यांचे विचार आधुनिक काळाशी कसे सुसंगत आहेत हे  पु. विनोबा ,सायनेकर सर आपल्याला समजावून देत असतात. 

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या या श्लोकाचा अर्थ सांगताना विनोबा वेदांताचा विज्ञानयुगाशी मेळ बसवून  म्हणतात ब्रह्म सत्यं, जगत स्फूर्ती; जीवनं  सत्यशोधनम !!