Friday 13 May 2022

मनुष्यत्व दुर्लभम!

श्रीमद् शंकराचार्य यांच्या विवेकचूडामणी ग्रंथात तिसरा श्लोक म्हणतो. 



 दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम्।
मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः॥

These three are difficult to obtain in this world and depend on the mercy of the gods, – the human birth, the desire for salvation, and the company of the great-souled ones. 
आचार्य म्हणतात माणसाचा जन्म , मोक्षप्राप्तीची इच्छा , आणि महा पुरुषाचा सहवास दुर्मिळ आहे . ज्यांना हे लाभते त्यावर देवाची कृपा समजावी. 
प्राणीमात्रात मनुष्य श्रेष्ठ आहे हे आपण जाणतोच , तो नराचा नारायण किंवा वानर बनू शकतो. ते त्याच्या हाती आहे. मोक्षप्राप्तीची इच्छा, मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मुक्ती असा नसून छोट्या छोट्या गोष्टी पासून मुक्त होणे , राग , लोभ , हव्यास या गोष्टीवर संयम मिळवणे म्हणजे मुक्त होणे.  एखादी  सवय प्रयत्नपूर्वक सोडणे म्हणजे त्या सवयी पासून मुक्ती. होय ना !!  आपल्या अवती भोवती मोठी मोठी माणसं असतात. त्याचे मोठे पण गुणांवर अवलंबून असते. अश्या माणसाच्या सहवासाने अनेक गोष्टी आपल्या जीवनात उतरत असतात. आपल्या आईवडिला कडून , शिक्षकांकडून , मित्रांकडून काही गोष्टी आपण शिकत असतो त्याचा प्रभाव आयुष्यभर राहत असतो.  हे सर्व जमून येणे म्हणजेच ईश्वरी कृपा. 

  

Thursday 12 May 2022

संजीवनी व्याख्यानमाला २०२२

पुष्प १ ले 

"भविष्यकाळातील माध्यमे, तंत्रज्ञान व मानसशास्त्र 

तंत्रज्ञानामुळे माध्यमांचा वेग प्रचंड वाढलाय. श्रीमती नीलांबरी जोशी अब्राहम लिंकन यांच्या खुनाची बातमी लंडनला पोचायला १८६५ मध्ये १२ दिवस लागले होते. तर २००१ मध्ये ट्वीन टॉवर पडताना जगभरातील तब्ब्ल २०० कोटी लोकांनी थेट पाहिलं इतका प्रचंड
वेग तंत्रज्ञाना मुळे माध्यमांना प्राप्त झाला आहे. असे प्रतिपादन संगणक तज्ञ श्रीमती नीलांबरी जोशी यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत "भविष्यकाळातील माध्यमे, तंत्रज्ञान व मानसशास्त्र " या विषयावर बोलताना केले. माध्यमांचा, मौखिक , लिखित ते टेलिव्हिजन, इंटरनेट पर्यंतच्या प्रवासाचा आढावा त्यांनी घेतला. मानसशास्त्राचा आधार घेऊन डिजिटल माध्यमं बातम्या, जाहिरातींकडे कसं लक्ष वेधून घेत असतात हे उदाहरणासहित सांगितलं. फेसबुक व इंटरनेट आपल्या नकळत आपली माहिती गोळा करत असते. आपल्याला हवं ते, ,आवडतं ते दाखवून माध्यमं एकारलेपण वाढते तसेच फेसबुक, व्हाट्सअँप्स चं व्यसन वाढत आहे. सेल्फी मुळे नटणे , खाद्यपदार्थांची सुबक मांडणी करणे , पर्यटनाच्या ठिकाणी साहस करणे इत्यादी गोष्टी आल्या. तंत्रज्ञान जसं वरदान आहे त्याच प्रमाणे त्याचे तोटेही आहेत. त्याचा योग्य व पुरेसा वापर करायला हवा. म्हणजेच डिजिटल मिनिमाइल्सम. माध्यमं व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानसशास्त्रात वेगवेगळ्या विभागाची भर पडलीय जशी हेल्थ सायकॉलॉजि, एज्युकेशनल सायकॉलॉजि, फोरेंसिक सायकोलॉजी, मीडिया सायकॉलॉजि, कॉम्युनिटी सायकॉलॉजि ज्यात अभ्यासाच्या आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध होत आहेत. डिजिटल मीडिया,इंटरनेट लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी निर्माण झाली आहेत. मानसशास्त्राचा उपयोग करून सजग मानवी समूह निर्माण करणे हे आव्हान आहे. संजीवनी प्रतिनिधी नरेश जोशी यांनी अध्यक्ष म्हणून मॉर्गन स्टॅनली येथे व्हीप असलेल्या श्रीमती प्रणिता नाईक ह्यांचं स्वागत केलं. अध्यक्षांच्या हस्ते वक्त्या श्रीमती नीलांबरी जोशी यांचं स्वागत करण्यात आलं. नरेश जोशी ह्यांनी दोन वर्षानंतर पटांगणात व्याख्यानमाला करतोय याचा आनंद व्यक्त केला , गेल्या दोन वर्षातील संजीवनीच्या कामाचा आढावा घेतला. विशेषतः कोरोना काळात संजीवनी टीमने केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकात मांडला.






नुकत्याच MPSC स्पर्धापरीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या कुमारी ऋतुजा दिलीप नाईक हिचा श्रीमती नीलांबरी जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.











सुरवातीला सौ रीमा नाईक हिने ईशस्तवन सादर केलं .सौ नेहा पाटील हिने कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन केलं. व्याख्यानाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.


पुष्प दुसरे.

"स्वा. सावरकर - आक्षेप व वास्तव" 

ब्रिटिशांकडे  माफी मागणे  हा डावपेच.   अभ्यासक अक्षय जोग.


स्वा. सावरकरांनीच  माझी जन्मठेप या पुस्तकात माफीपत्रा विषयी लिहून ठेवलं आहे. ते पक्के उपयुक्ततावादी होते. पन्नास वर्ष तुरुंगात खितपत पडून राहणारे नव्हते. माझ्या देहाचा , बुद्धीचा देशाला काय उपयोग होईल याचा सदैव विचार करणारे होते. शत्रूशी खोटे बोलणे द्रोह

करणे यात त्यांना काहीच वावगं वाटत नव्हतं. स्वतः बॅरिस्टर असल्यामुळे ब्रिटिश कायद्याप्रमाणे अर्ज, विनंत्या करून सुटका करुन घेता येते हे त्यांना माहित होतं; त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी माफीपत्र लिहली. माफी हा शब्द मराठी नसून क्षमापत्र हा खरा शब्द आहे. क्षमा मागून सुटका करुन घेणे आणि देशकार्य, समाजकार्य पुढे सुरु ठेवणे हे स्वा. सावरकरांचे धोरण होते. असे प्रतिपादन अक्षय जोग यांनी संजीवनी व्याख्यानमालेत "स्वा. सावरकर - आक्षेप व वास्तव" या विषयावर बोलतांना केले.    
एका व्याख्यानात सावरकरांवरील सर्व आक्षेपांविषयी बोलणं शक्य होणार नाही. सावरकरांनी निवृत्तिवेतनासाठी अर्ज केला होता असा आरोप केला जातो.  ब्रिटिशांच्या बंदिवासात असलेल्या क्रांतीकारकांना, सत्याग्रहींना ब्रिटिश सरकार कडून निर्वाहनिधी मिळत असे. ब्रिटिश सरकार आपलेच पैसे देत होते. ह्या अर्जामागे दोन कारणे होती सावरकर राजकीय बंदीवान आहेत ही सरकार दरबारी मान्यता मिळवणे  आणि सरकारकडून निर्वाहनिधी घेऊन त्यांच्याचविरुद्ध वापरणे.  
सावरकरांच्या हिंदुत्वावर  वेगवेगळे आक्षेप आहेत. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करण्याअगोदर हिंदूंच्या १०५ व्याख्या होत्या.

सर्वसमावेशक अशी हिंदूंची व्याख्या सावरकरांनी केली त्यात मुस्लिम , ख्रिश्चन येत होते. देशाची उभारणी धर्मावर नव्हे तर विज्ञाननिष्ठा  व बुद्धिनिष्ठतेवर व्हावी अशा मताचे स्वा.सावरकर होते.

कार्यक्रमाची सुरवात स्वा. सावरकरांच्या जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे ह्या स्वतंत्रदेवतेच्या आराधनेने करण्यात आली तर शेवट ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला. या गीताने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे पदाधिकारी  श्री.प्रभाकर नाईक होते. सुरवातीला चिराग पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत, ओळख करुन दिली. स्वा. सावरकरांचा       "देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो त्याचं आपण देणे लागतो तसेच ज्या समाजात आपण जन्म घेतो त्याचे देणे लागतो.  
        हा विचार सांगून व त्याची जाणीव आपण सर्व मंडळी ठेवू या अशी प्रार्थना केली.
सावरकरांची गीते सादरीकरणासाठी  कौस्तुभ पाटील, ध्रुव पाटील, विष्णु पाटील, नेहा पाटील, तेजल, रिमा  यांनी अरविंद पाटील व अनंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.


कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कु कनिष्का नाईक हिने केलं. व्याख्यानाला तरुण मंडळींची उपस्थिती उत्तम होती 



पुष्प तिसरे. 

"विवाह संस्कार - सहजीवन" 

आयुष्य खूप सुंदर आहे, 
                               डॉ. गौरी कानिटकर 

आयुष्य खूप सुंदर आहे, नवरा बायकोनी एकत्र येऊन या सुंदर आयुष्यात  रंग  भरणे गरजेचे आहे. असे समुपदेशक व अनुरूप विवाह संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा  डॉ गौरी कानिटकर यांनी संजीवनी व्याख्यानमालेत "विवाह संस्कार - सहजीवन" या विषयावर सांगितले 

. पुढे त्यांनी  अनिल अवचट यांचे  "ज्या माणसाबरोबर आपण घरात राहतो त्या माणसांना माझ्याबरोबर राहताना बरं वाटलं पाहिजे ही माझी जबाबदारी "  हे वाक्य सांगून त्या म्हणाल्या    अशी जबाबदारी प्रत्येकाने घेतल्यास सहजीवन सुखाचं होईल.  मुलं जर घरची कामं करत नसली तर ती पालकांची जबाबदारी आहे. मुलांना कामं सांगा, त्यांना पांगळं बनवू नका. अनेक उदाहरणं देऊन सहजीवन अधिक चांगलं, आनंदी  बनवता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं.  












अध्यक्षस्थानी  ऍडव्होकेट सौ रुपाली पाटील होत्या. सौ दीप्ती नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व प्रास्ताविकात संजीवनी वाचन अभियानाची माहिती दिली आठ ठिकणी वाचन अभियान सुरु असून मुलांचा प्रतिसाद चांगला आहे. इतर ठिकाणी अभियान सुरु करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.















 कु निधी नाईक हिने सुरेख सूत्रसंचालन केले. सौ रीमा नाईक हिच्या ज्ञानेश्वरांच  दीप से दीप जलाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो  ह्या गीताने पूरक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.  








व्याख्यानमाला २०२२  अधिक सुंदर करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्री विष्णू पाटील , श्रवणीय करणा-या त्रिलोक साउंड सर्व्हिस , पटांगण उपलब्ध करणा-या सामवेदी ब्राह्मण संघ. मंडप व इतर व्यवस्थेसाठी किशोर नाईक आणि  जाणकार  श्रोत्यांचे संजीवनी तर्फे सौ दीप्ती नाईक ह्यांनी आभार मानले. 

Saturday 7 May 2022

अज्ञात

 ज्ञातातले अज्ञात ठिकठिकाणी आहे. 

आणि  केवळ अज्ञात....  आहेच . 
आपण ज्ञातातील अज्ञात शोधण्यात गुंग आहोत. केवळ अज्ञातातले शोधणे लक्षातच घेत नाही. 
अज्ञात आहे खूप आहे ... हे समजून घेण्याचे धैर्य मला हवंय. 
अज्ञात 
आजचा दिवस कसा जाईल?
आयुष्यात पुढे काय होईल? ज्योतिषी भविष्य सांगतो , ढोबळ , तपशील अज्ञात. 
माझी तब्येत आयुष्यभर चांगली राहील? अज्ञात . 
नवे रोग निर्माण होतात आधी अज्ञात. 
माणसांत षडरिपू आहेत. त्या मागे निसर्गतत्त्व काय?
माणसांत सुष्ट दुष्ट आहेत या मागे निसर्गतत्त्व काय?
माणसांत परिवर्तन करायचंय . असे असे किंवा तसे तसे परिपूर्ण पद्धत अज्ञात आहे. 
बुद्धी , प्रज्ञा सर्वांना सारखी नसते यामागे निसर्गतत्त्व काय?
वेड लागणे ... वेडाला सृष्टीत स्थान काय?  निसर्गतत्त्व काय?
घाबरणे .. घाबरवणे छळणे ,  छळवले  जाणे या मागे निसर्गतत्त्व काय?
अहंकार असण्यात  निसर्गतत्त्व काय?  स्वाभिमान , गर्व, अस्मिता... निसर्गतत्त्व? ..
अहंकार पूर्णपणे जातो?
पावित्र्य म्हणजे काय? एखादी वस्तू,प्राणी , एखादे स्थान पवित्र कसं? इतर वस्तू, प्राणी इतर स्थान अपवित्र ..या  मागे निसर्गतत्त्व काय?  
सृष्टीत सौंदर्य आहे , कुरूपता आहे , बीभत्सता आहे, निर्मिती आहे, विनाश आहे.... यामागे निसर्गतत्त्व काय?
सर्वाभूती प्रेम , प्रेम उडणे द्वेष करणे हिंसा करणे या सर्वामागे निसर्गतत्त्व काय?
मृत्यू 
सर्व कळत नाही खूप अज्ञात आहे. तरी माणूस जीवन जगतोय या मागे निसर्गतत्त्व काय?
एकूण अस्तित्व का?जीवनाचा अर्थ काय? खूप अज्ञात आहे. 
घाबरणारे असतात आणि घबरावणारे असतात 
काय करायचं भयाचे?

अज्ञातातले शोधणे ही गोष्ट पक्की रुजलीय..  पुढची गोष्ट ........  अंतर्मुख ....