Monday 3 June 2019

मुंगी उडाली आकाशी------ग्रेटा थनबर्ग

 
ग्रेटा थनबर्ग
  स्वीडनमधील एक शालेय बालिका. स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे. तिने तिसरीत- म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी ‘हवामानबदल’ हा शब्द ऐकला आणि ती त्याच्या खोलात जाऊ लागली. ग्रेटाच्या शाळेत पर्यावरणाची हानी, हवामान- बदलामुळे होणारे भयंकर परिणाम यांविषयी माहिती दिली जायची, वृत्तपट दाखवले जायचे. त्याचवेळी जगभर होणाऱ्या घडामोडी जाणून घेत असताना संवेदनशील ग्रेटा दु:खी होत असे. जाहीर पणे हवामानबदला वर बोलायला सुरवात केली .  सुरुवात अर्थात घरापासूनच! कार्बनच्या पाऊलखुणा जाणणाऱ्या ग्रेटाने तिचे वडील (विख्यात अभिनेते) स्वान्त आणि आई (प्रसिद्ध नृत्यांगना) मलेना यांना शाकाहारी होण्यास प्रवृत्त केले. दोघांना विमानप्रवास बंद करायला लावला. या छोटय़ा मुलीने आई-वडिलांना उच्चभ्रू, उधळ्या जीवनशैलीकडून साधेपणाकडे नेले.  (मुलं ही आईवडिलांना घडवतात )

२०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात स्वीडनच्या जंगलात भयानक वणवा पेटला, तर २०१८ साली युरोपभर उष्णतेची लाट पसरली.  ती १५ वर्षांची चिमुकली मात्र गप्प बसली नाही. एक दिवस तिने बोर्ड रंगवला *_'पर्यावरणासाठी शाळेचे आंदोलन'_* आणि तो बोर्ड घेऊन ती सरळ स्वीडनच्या संसद भवनासमोर जाऊन बसली.
ती एकटीच बसली होती. येणारे-जाणारे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते, बोर्ड वाचत होते, पण तिच्या या आंदोलनात कुणीही सामील झाले नाही.
तरी ती मागे हटली नाही. रोज तो बोर्ड घेऊन ती संसदेसमोर बसू लागली. ही हिंमत आपल्यात कधी येईल का? शाळा बुडते म्हणून तिचे आईवडील रागावले. तिने त्यांचेही ऐकले नाही. तिच्यासाठी पर्यावरण वाचवणे महत्त्वाचे होते.
रोज तिला संसद भवनासमोर बसलेली पाहून हळूहळू एकेक सामील होऊ लागला. सकाळी ६ वाजता ही पोर घरातून निघायची, संसद भवनासमोर बोर्ड घेऊन बसायची आणि दुपारी ३ वाजता घरी परतायची.
*२० ऑगस्ट २०१८ पासून हा सिलसिला सुरू झाला.*
त्यानंतर ती  शुक्रवारी सतत आंदोलनं करत आहेत. ‘Fridays For The Future’ हे आंदोलन विविध देशांत पोहोचलं आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत. शुक्रवारी जवळपास 100 देशांत हे आंदोलन झालं.
दर शुक्रवारी ग्रेटा लोकांना हवामान- बदलाविरोधात कृतिशील होण्याचे आवाहन करू लागली. तिच्या बातम्या जगभर जात राहिल्या आणि तिला ओसंडून पाठिंबा मिळू लागला. ग्रेटा नामक बालिकेचे हवामानबदलाविषयीचे विचार ऐकण्यासाठी तिला जगभरातून आमंत्रणे येऊ लागली
ग्रेटा म्हणाली, ‘संपूर्ण मानवजात अभूतपूर्व संकटाला सामोरे जात असताना आपले नेते अतिशय बालिश वर्तन करीत आहेत. आपण जागे होऊन र्सवकष बदल घडवणे अनिवार्य आहे.’
मी ग्रेटा थनबर्ग! मी १६ वर्षांची असून, पुढील पिढय़ांच्या वतीने आपल्याशी संवाद साधत आहे. आपण म्हणता, आम्ही लहान आहोत. परंतु आम्ही हवामानाचे शास्त्र जे सांगत आहे त्याचीच उजळणी करीत आहोत. आम्ही वेळ वाया घालवतो याची तुम्हाला काळजी वाटत आहे. पण तुम्ही विज्ञानाचा संदेश ऐकून आमचे हिरावलेले भविष्य परत मिळवून द्याल, त्याक्षणी आम्ही शाळेत परत जाऊ. याचसाठी हा अट्टहास आहे. हे अती आहे काय? तुमच्या मुला-नातवंडांप्रमाणे २०३० साली मीदेखील ३० वर्षांची होईन. हे वय फारच महत्त्वाचे असते असे तुम्ही आम्हाला सांगता. पण आमच्यासाठी ते तसे असेल का, हे काही मला सांगता येत नाही. ‘मोठी स्वप्ने बघा’ असे आम्हाला लहानपणी सांगितले गेले. तुम्ही आम्हाला खोटी आशा दाखवली, आमच्याशी खोटे बोलत आलात. आमचे भवितव्य अंध:कारमय आहे याची जाणीवच आमच्यापकी कित्येकांना नाही. जगाची कधीही भरून न निघणारी हानी घडविणाऱ्या घटनांची साखळी २०३० पासून सुरू होईल. हा संहार होऊ द्यायचा नसेल तर आतापासूनच तातडीने कर्ब उत्सर्जन निम्म्यावर आणण्यासाठी कृती निकडीची आहे. हवेचे प्रदूषण, तापमानवाढ व आपत्ती यासंबंधीची आय.पी.सी.सी. (इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज)ची आकडेवारी अनेक छुप्या संभाव्यतांचा विचार करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, आपण कडेलोटाकडे जात आहोत, अशी ही आणीबाणी आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?
ती सर्वांना सांगतेय " तुमचे मतभेद विसरून तुम्ही कृती केली पाहिजे. आम्हा मुलांना आमची आशा व स्वप्ने परत हवी आहेत, म्हणून आम्हाला हे करावे लागत आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?"
जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले : ‘हवामानबदल समजून सांगण्याएवढे तुम्ही प्रगल्भ नाही. तुम्ही आम्हा बालकांवर अवाढव्य ओझे लादले आहे. लोकप्रिय होण्यासाठी धडपडण्याची मला आस नाही. मला आपली सजीव पृथ्वी आणि हवामान यांची काळजी आहे.’  , ‘पृथ्वीवरील अमूल्य संपदा ओरबाडून काही कंपन्या, काही लोक आणि काही धोरणकत्रे हे बेसुमार संपत्ती कमावत आहेत. येथे जमलेल्यांपकी अनेक जण या गटातील आहेत. परंतु त्यामुळे तुम्ही तुमच्या बालकांना संकटांच्या खाईत लोटत आहात.’ ती जगातील धोरणकर्त्यांना म्हणाली, ‘तुम्ही आशावादी असावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही अस्वस्थ होणे आवश्यक आहे. मला दररोज वर्तमानाची भीती वाटते. तुम्हालाही तशी भीती वाटली तरच तुमचे वर्तन संकटकाळातून बाहेर काढण्याचे असेल. घराला आग लागल्यावर आपण आटोकाट प्रयत्न करू, तसे शर्थीचे प्रयत्न तुम्ही करा. कारण आपल्या घराला खरोखरीच आग लागलेली आहे.’



तिच्यामुळे स्फूर्ती घेऊन हवामानबदल रोखण्याचे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ होत आहे. स्वतच्या देशाला व जगाला जाग आणण्यासाठी लाखो मुले शाळा बंद ठेवत आहेत. १५ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत १२० राष्ट्रांतील १५ लाख विद्यार्थ्यांनी ‘हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी’ हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या.
जगाचे भविष्य घडविणाऱ्या दहा किशोरवयीन मुलामुलींचा ‘पुढील पिढीचे नेते’ असा गौरव ‘टाइम’ साप्ताहिकाने २७ मे २०१९ च्या विशेषांकात केला आहे. आणि अर्थातच मुखपृष्ठावर झळकत आहे- ग्रेटा! मोठय़ांना उद्देशून ‘तुम्हाला ऐकू येतंय ना?’ असे काकुळतीने वारंवार विचारणारी ग्रेटा ‘टाइम’ला म्हणाली, ‘नऊ महिन्यांपूर्वी माझं बोलणं कुणाच्याही कानांपर्यंत जात नव्हतं. आता संपूर्ण जग मला ऐकते आहे.’  


ग्रेटामधील निर्मळता व प्रांजळपणा लहानथोरांना खेचून घेत आहे. नॉर्वे सरकारने २०१९ च्या नोबेलसाठी १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिचे नाव सुचवले आहे आणि त्याला जगभरातून समर्थन मिळते आहे. तिच्या अवस्थांतराविषयी ग्रेटा म्हणते, ‘शाळेत मी अबोल, बुजरी, भिडस्त, मागे राहणारी म्हणून प्रसिद्ध होते. आणि आता मला सतत बोलावे लागत आहे आणि लोक ऐकत आहेत असा विचित्र विरोधाभास घडून आला आहे.’

(नवाकाळ ,लोकसत्ता वरून )

No comments:

Post a Comment