Thursday 14 October 2021

भावसंचित!

 दुर्गा भागवत म्हणजे मराठी वाङमय विश्वातील एक ठसठशीत नाममुद्रा चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या व्यासंगी लेखिका. त्यांच्या असंकलित आणि पूर्वप्रकाशित स्फुट साहित्याच्या तीन खंडातील एक    "भावसंचित".

भावसंचित मध्ये ललितलेख , व्यक्तिचित्रे , आत्मपर लेखनाचा समावेश आहे.  सीता रामाची कोण? आणि सीतेची ओळख असे दोन लेख यात आहेत. जे आपणास राम , सीता या विषयी नवीन दृष्टिकोन देतात. 
सीता म्हणते धर्मात सुखं  न सुखात सुखं !  अर्थ धर्मच सुख देतो, सुख सुख देत नाही.
लव कुश यांच्याशी युद्धानंतर श्री रामाला पुन्हा सीतेने अग्निदिव्य करावं असं वाटतं. सीता भूमिमातेला उदरात घेण्याची प्रार्थना करते आणि रामाकडे बघत , रामासमोर भूमीच्या उदरात प्रवेश करते.,  रामाची पत्नी रामाची राहिली नाही, भूमीची कन्या भूमीमय झाली. ती राममय झाली नाही म्हणून लेखिकेला प्रश्न पडतो सीता रामाची कोण होती ? सीतेचे  व्यक्तीमत्त्व जाणून घेण्यासाठी हे लेख वाचायला हवेत. 

दुर्गाबाईंचा सडेतोड, निर्भीडपणा आपण आणीबाणीच्या वेळी पहिला आहे तत्त्वासाठी परखडपणे मतं मांडणे हा त्याच्या स्वभाव होता हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकातील ऑल इंडिया रेडिओ उर्फ आकाशवाणी हे स्फुट,पत्र वाचायलाच हवं. पुस्तकाच्या शेवटी गांधीजींची ओळख हा लेख आहे तो दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर लख्ख प्रकाश टाकतो. एका कार्यक्रमात , कार्यकर्ता त्यांना विचारतो महात्माजींची ओळख करून घ्यायची का ? त्यांचं उत्तर चक्क नाही होतं. विचार करा !!
त्या पुढे म्हणतात गांधीजींची ओळख मनाला आहेच केव्हांही संवाद साधता येतो नि उत्तर ठाम व अचूक येते. त्यांचं मार्गदर्शन कधी थांबत नाही. 
या पुस्तकातील पत्रांचा निसटत्या आठवणी त्यातील आनंदीबाई व अहिल्याबाई होळकर या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या स्रियांचा पत्रव्यवहार आणि घटना अनन्यसाधारण आहे.इथे आनंदीबाईंनी प्रसंगारूप प्रांजळ लिनपणा दाखवला आहे. अहिल्याबाईने कृतज्ञता बुद्धीने सहज आणि शानदारपणे दरबारात मालकिणीचा समादर केला. 
 मरणाविषयी दुर्गाबाई काय म्हणतात बघा. 
मी निसर्गशरण आहे, जीवनशरण आहे; तेव्हा मरणशरणता स्वीकारायला मला कसली आली आहे खंत? मरण तर सुख-दुःख पार करणारे नि नव्या पुनर्जीवनाला आमंत्रण देणारेच  आहे ना? 

No comments:

Post a Comment