Thursday 8 September 2022

अथातो अर्थ जिज्ञासा"

 



आधी ते अर्थकारण, जगातील सर्व घडामोडी अर्थकारणाच्या अवतीभोवती किवा
त्यामुळेच घडत असतात. बाजारातील प्रत्येक व्यवहार सर्व पक्षांचा फायदा करतो. अर्थशास्त्र समाजधारणेच्या केंद्रस्थानी असते.
 समृद्ध आणि उन्नत समाज रचनेकडे वाटचाल करण्यासाठी अर्थशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्राध्यापक चार्ल्स व्हीलन यांचे २००२  मध्ये प्रकाशित झालेले, नेकेड इकॉनॉमिक्स: अनड्रेसिंग द डिस्मल सायन्स हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. डॉ अजय ब्रह्मनाळकर यांनी  “स्वार्थातून  सर्वार्थाकडे”   असा केलेला  अनुवाद राजहंस प्रकाशनाने २०१९ ला प्रकाशित केला आहे. नफ्यातोट्याचा  विचार करणे, म्हणजे पैश्याचा विचार करणे, म्हणजे माणूसपणा गमावणे. आर्थिक विचार म्हणजे स्वार्थी विचार. एकाचा लाभ ही दुसर्‍याची हानी. अशी मध्यमवर्गीय मानसिकता.  एकमेकांना सहकार्य केल तर उभयपक्षी लाभकारक शक्यता उत्पन्न होतात. म्हणजेच स्वार्थाकडून सर्वार्थाकडे जाता येते हे सांगणारे पुस्तक. प्रथम तगणे, मग जगणे आणि मगच धन्यता हे कळण्यासाठी अर्थशास्त्रातील मुलभूत सिद्धांत समजून घेतलेच पाहिजेत. ते काम हे पुस्तक करते. १३ प्रकरणातून अर्थशास्त्र कश्या प्रकारे काम करतं, मूलभूत संकल्पना काय आहेत. याचं समजेल अश्या सोप्या भाषेत विवेचन केलं आहे.

१) बाजारपेठ : पहिल्या प्रकरणात बाजाराची शक्तीस्थानं काय आहेत आणि बाजार कसा चालतो हे सांगीतलं आहे. इतिहास पाहिला तर लक्षात येते की कुठेही व्यापारी आधी पोहचल्याचे दिसते. स्वेच्छेने केलेल्या देवाणघेवी वर बाजार चालतो. विचारविनिमय करून व्यवहार करतो, असे व्यवहार परस्परांना फायदा देणारे असतात. माणूस स्वत:च्या फायद्यासाठी काम करत असतो. ह्या गृहितकावर अर्थशास्त्र चालतं. बाजारपेठ कर्तृत्वाला ,कार्यक्षमतेला आणि कल्पकतेला संधी देते. प्रगतीच्या आणि उन्नतीच्या फार मोठ्या शक्यता खुल्या करते.   बाजारपेठ ही मानवी स्वभावाशी सुसंगत आहे. कामाचा थेट फायदा होतो तेव्हा माणूस कठोर परिश्रम करतो. उच्च क्षमतेपर्यंत पोहचण्यासाठी प्रेरित होतो. कंपन्या आणि ग्राहक त्यांच्या स्वतःच्या हितासाठी कार्य करतात. बाजारातील प्रत्येक व्यवहार सर्व पक्षांचे हित जोपासतो. गिऱ्हाईक स्वतःचे जास्तीत जास्त हित पाहते, तर फर्म आपला जास्तीत जास्त नफा पाहते.

 बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही आपले जीवनमान सुधारणारी बलदंड शक्ती आहे.

बाजारपेठेत अनैतिक असं काही नसते. तुटवडा जास्त तिची किंमत अधिक. त्या वस्तूचे मोल पाहिले जात नाही.

किंमतीच्या आधारे वस्तूचे वितरण होत असल्याने बाजारपेठ स्वत:च स्वत:ला सावरणारी व्यवस्था बनते.

व्यक्तीचे  निर्णय  साधारणता वर्तणूकीय अर्थशास्त्रावर म्हणजेच मानसशास्त्र आणि अर्थशास्त्रावर अवलंबून असतात.

२) प्रोत्साहन: प्रोत्साहन माणसाला कार्यप्रवण बनवते. व्यक्तीचा स्वार्थ आणि समाजहित यात जेव्हा अंतर्विरोध उभा राहतो तेव्हा समाजास हितकारक वागण्यासाठी व्यक्तीला प्रोत्साहित केलं जातं , गाजर दाखविला जातो

बक्षीस  स्वार्थ, स्पर्धा आणि कर  हे चार घटक मानवी वर्तनावर  प्रभाव टाकतात. कॅशब्याक हे प्रोत्साहन असते. तर दंड ही शिक्षा.

 

३) शासन आणि अर्थव्यवस्था : समाजाचे हित साधणा-या बाजारपेठे साठी, अर्थव्यवस्थेसाठी उत्तम शासन व्यवस्था आवश्यक असते. चुकीची शासन प्रणाली अर्थव्यवस्था नासवू शकते. शासना शिवाय बाजारपेठ कार्य करू शकत नाही. बाजारपेठीय नियम सरकार बनवते. मालमत्तेच्या अधिकाराची व्याख्या, व्यापारासाठी पायाभूत सुविधा सरकार पुरवते. सार्वजनिक सेवा सुविधा शासनामुळे उपलब्ध होतात. काही बाबीत शासनाच्या हस्तक्षेपामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

४) माहितीचे अर्थशास्त्र :कुठलाही व्यवहार उभयपक्षी न्याय व्हायला हवा असेल तर दोन्ही बाजूंना व्यवहारांशी निगडीत माहिती चोख आणि परिपूर्ण हवी. माहिती कशी मिळवतात ,ती वापरतात कशी , निर्णय कसे घेतात हे समजून घेणे हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे. माहितीच्या आधारे बाजारपेठेचा कल समजतो. ज्यांना अधिक माहिती आहे त्याचा अधिक फायदा होतो. परंतु माहितीचा असमतोल व्यवहार थांबवतो. बाजारात नवनवीन वस्तू आणि दोन अपरिचिता मध्ये व्यवहार होत असतात. ब्रान्डईग ग्राहकात गुणवत्ता व सुरक्षितता  विषयी विश्वास निर्माण करते.  माहिती महत्वाची , अर्थशास्त्रज्ञ   माहिती सोबत आपण काय करतो आणि माहिती उपलब्ध नसताना आपण काय करतो याचा अभ्यास करतात.

५) मानवी भांडवल : व्यक्तीमधील शिक्षण,कामाचा अनुभव, उत्साह, प्रतिभा, कौशल्य या गोष्टी य्तेतात, यातील गुतंवणूक व्यवहारात फ्याद्याची ठरू शकते. मानवी भांडवलामध्ये चिकाटी, प्रामाणिकपणा, सर्जनशीलता देखील समाविष्ट आहे. जटिलता आजच्या काळाची ओळख आहे. त्यामुळे कुशल मानवी भांडवलाची कायमच मागणी असणार आहे.  तंत्रज्ञान हुशार कामगाराची उत्पादकता,  मागणी वाढवते तर अकुशल कामगारांना बेकार बनवते.

६) वित्तीय बाजारपेठ:  वित्तीय बाजारपेठ समभाग व रोखे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. या बाजारपेठेत अत्यंत किचकट करारमदार होत असतात. भांडवल दुर्मिळ असते. महागाईमुळे प्रतिवर्षी भांडवलाचे मूल्य कमी कमीच होत असते.  भांडवल वाढवणे, अतिरिक्त भांडवल गुंतवणे, भांडवल सुरक्षित करणे आणि चांगला परताव मिळवणे ही चार मुख्य उद्दिष्ट आहेत.

७) संघटीतांची सौदाशक्ती : बाजारपेठेत वेगवेगळे गटतट आपआपले हितसंबंध जोपासण्याचे काम करत असतात. या शक्ती कसं काम करतात हे ह्या प्रकरणातून जाणता येईल.

८) आर्थिक प्रगतीचे निकष- किती ‘अर्थ’ किती ‘पूर्ण’?:  मोजमापाची पद्धत सर्वव्यापी आहे. मोजमाप केले नाही, तर तुलना करता येत नाही, निर्णय घेता येत नाही, बरोबर की चूक, हे ठरवता येत नाही. आर्थिक प्रगती सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)   निर्देशंकाने मोजतात. GDP वाढला तरी जनतेत आनंद,समाधान, वाढतेच असे नाही. त्यातूनच सामाजिक स्वास्थ्य निर्देशांक ही कल्पना निघाली.  सर्व वस्तू/सेवांचे देशांतर्गत उत्पादन मोजणा-या निर्देशांकांची सविस्तर माहिती या प्रकरणात पाहायला मिळते.

 

९) रिझर्व बँक : देशातील सर्व बँकांची शिखर बँक म्हणजे रिझर्व बँक. व्याजदर निश्चित करणे, पतपुरवठा, मुद्रा धोरण, चलनाचे अवमूल्यन किंवा मूल्यवर्धन अश्या गोष्टी रिझर्व बँकेच्या अधिकारात येतात.  स्वस्ताई , महागाई याचे चलनसंकोच, चलनवाढ याच्याशी  असलेले नाते, रिझर्व बँकेचे असलेले नियंत्रण हे सगळे मुळापासून समजून घेणे गरजेचे आहे.

१०) आंतरराष्ट्रीय अर्थकारण : प्रत्येक देशाचे चलन त्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत चालते. दोन देशांत वस्तू सेवांची देवाणघेवाण होतना त्यांच्या चलनाचे तुलनात्मक मूल्य ठरवले जाते त्याला विनिमय दर म्हणतात. साधारता विनिमय दर म्हणजे क्रयशक्ती समतुल्यता (purchase power Parity). विनिमय दर (Exchange Rate) ठरवण्याच्या विविध पद्धती, त्यातील फायदे तोटे आणि जबाबदार चलन धोरण म्हणजे काय हे प्रकरणातून समजेल.

११) व्यापार आणि जागतिकीकरण: स्वच्छेने घडणारे उभय-लाभकारी व्यवहार म्हणजे व्यापार. कमी श्रमात जे जास्त उत्पादित करू शकतो ते जास्त उत्पादन करायचे आणि अतिरिक्त उत्पादनच्या बदल्यात इतर गरजेच्या वस्तू मिळवायच्या इतके साधे सूत्र या व्यवहारात आहे. दळणवळण सुधारत गेले, तसे व्यापाराच्या कक्षा गावकुसाबाहेर रुंदावत गेल्या आणि हळूहळू व्यापार आंतरराष्ट्रीय होऊ लागला. व्यापारात वस्तूची देवाणघेवाण होते तशीच सांस्कृतिक देवाणघेवाण होते.

१२) विकासाचे अर्थशास्त्र : उत्पादनक्षमता आपले जीवनमान ठरवत असते. उत्पादनामुळे कामगार सक्षम बनतो, अधिक संधी, कौशल्य मिळवतो. उत्पादनामुळे व्यापार वाढतो सुविधा वाढतात. विकासासाठी जबाबदार शासन हवे हा मुद्दा इथे स्पष्ट होतो.

१३) समारोप : अर्थशास्त्र हे एक साधन आहे. अपरिपूर्ण जग समजून घ्यायला आणि ते सुधारायला अर्थशास्त्राची मदत होऊ शकते. लेखकांनी २०५० सालातील आयुष्य कसे असावे यावर विचार करायला काही प्रश्न ठेवले आहेत.

माक्रोसोफ्टचे संस्थापक बिल गेट्स नी एका ठिकाणी म्हटलं आहे की यशस्वी होण्यासाठी व्यवसायातील कौशल्याबरोबरच अर्थशास्त्र कळणे आवश्यक आहे.

 

No comments:

Post a Comment