Thursday 28 September 2017

"कालपरवा " साधना प्रकाशन नी प्रकाशित केलेलं श्री रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक Politics and Play ह्या स्तंभातील निवडक लेखांचा  श्रीमती कुमुद कारकरेंनी केलेला अनुवाद. 
श्री रामचंद्र गुहा, इतिहास, राजकारण,समाजकारण,पर्यावरण आणि क्रिकेट या पाचही क्षेत्रांत संशोधनपर लेखन करणारे स्तंभलेखक. त्यांची सर्वच मत पटतील असं नाही, परंतु विचार करणा-यांनी  आपली मतं तपासून  तर  घ्यावी. 


अनटचेबल : गांधीवादी आणि आंबेडकरवादी यामध्ये अस्पृश्यता विषयी गांधीवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणीतील फरक छान पद्धतीने मांडला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचा एक मार्ग , जुलूम करणा-याची सद्सदविवेक बुद्धी जागी करणे ;तर दुसरा मार्ग पाश्चिमात्य किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले साखळी संडास बांधून त्याचा प्रसार करणे. अस्पृश्यतेचा त्याग करून त्या पापातून मुक्त होऊन हिंदू धर्माने पवित्र व्हावे असे गांधींना वाटत होते तेव्हा सामाजिक उच्चंनीचता किंवा पक्षपात हाच हिंदू तत्वज्ञानाचा गाभा आहे असे आंबेडकर म्हणत होते. काळाच्या ओघात गांधींची हरिजन ही उपाधी मागे पडली आणि आंबेडकरांनी पुरस्कारलेली दलित ह्या उपाधीचा स्वीकार केला. 

तिहासकारांचे इतिहासकार या मध्ये सर्वपल्ली गोपाल (डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चिरंजीव) यांच्या पुस्तकांचा , मतांचा उल्लेख आला आहे. त्यांनी म्हटलंय बहुसंख्यांक जमातीचा जातीयवाद हा अल्पसंख्यांकांच्या जातीयवादापेक्षा अधिक धोकादायक आहे. कारण बहुसंख्यांकांचा जातीयवाद राष्ट्रवाद म्हणून मिरवला जाण्याचा धोका असतो. 
आणीबाणी विषयी त्यांनी म्हटलंय १९७५ ते १९७७ या दोन वर्षातील घडामोडींनी या देशात नेहरू या नावाला काळे फासले आहे. पण १९८६ ते १९८८ दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या(शहाबानो प्रकरण) त्यांच्यामुळे नेहरू आणखीनच बदनाम झाले. आणि २००९ ते २०१३ दरम्यान झालेल्या घटनांनी नेहरूंच्या वारसांनी त्यांचे नाव धुळीला मिळवले आहे. एस गोपाल ,गांधी आणि सुभाषचंद्र विषयी लिहतात. गांधींनी हिंदू चालीरीती व रूढी यांच्यामधील पडदा , अस्पृश्यता या सारख्या प्रथांना आव्हान देऊन त्यांच्याविषयी लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. बोसना मात्र भारतीय प्राचीन वैभव इतिहास वाचून एक प्रकारचे स्मरणरंजन होत असे. बोस यांना पडलेली पश्चिमेची भुरळ सैद्धांतिक बाबीसंबंधी नसून संघटनात्मक पद्धतीविषयी होती. तेथील पक्षशिस्त आणि स्वयंसेवी संघटना त्यांना आकर्षित करीत होती. 

विध्वंस की विकास या मध्ये लेखक म्हणतात नर्मदा बचाओ व मेधा पाटकर यांचा करिष्मा , धैर्य , सह्का-याशी , कार्याशी असेलेली त्यांची प्रतिबद्धता याचा आदर करीत असतानाही त्यांच्या या संघर्षातील एकूण डावपेचांबाबत  माझ्या   मनात थोडा संदेह आहे हा विषय अमेरिकन संघराज्याच्या आमसभेसमोर नेऊन आंतरराष्ट्रीयीकरण झाले, ही मोठी चूक होती. 

मंडेलांचे भारताशी जडलेले नाते : मंडेलांच्या जीवनावर गांधीजींचा प्रभाव होता हे सर्वश्रुत आहे. त्याच बरोबर दक्षिण आफ्रिकेतील राजकीय आणि सामाजिक जीवनावर भारतीयांचा खूप प्रभाव होता. द. आफ्रिकेतील पहिल्या संसदेत ४० पेक्षा अधिक भारतीय खासदार होते. त्याबद्दल मंडेला कडे तक्रार करण्यात आली तेव्हा ते म्हणाले खरे आहे त्यांच्या संख्येच्या मानाने खासदारांची संख्या जास्त आहे परंतु त्यांनी संघर्षात योगदान केलेले आहे त्या मानाने ती संख्या थोडी अल्पच आहे. 

मोदींच्या जमान्यात आंबेडकरांची वचने: घटनासमितीतील भाषणात आंबेडकरांनी तीन इशारे दिले होते.  आजच्या परिस्थिती ते किती लागू आहेत, ह्याचं विवेचन म्हणजे हा लेख. पहिला धोका म्हणजे विरोधासाठी संयम सोडून रस्त्यावर उतरणे (अराजकाचे व्याकरण ) दुसरा मुद्दा राजकीय लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यामधील भेद , राज्यघटना १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क देऊन राजकीय समानतेची ग्वाही देतो परंतु सामाजिक समानता ......   तिसरा इशारा सध्याच्या वातावरणात निकडीने लक्षात घेण्याची गरज आहे असे ते म्हणतात. भारतीयांनी कोणत्याही नेत्याचे अंधानुकरण करू नये. कृतज्ञता बाळगणे यात गैर काही नाही. कृतज्ञता व्यक्त करताना आत्मसन्मान विसरता येणार नाही. 

नेहरू-गांधी घराणेशाहीचा उदयास्त : या लेखात लेखक फार परखडपणे काग्रेसच्या सद्यस्थिती बद्दल मत मांडतात. नेहरू गांधी कुटूंबाच्या छायेतून दूर होण्यात किंवा पूर्णपणे अलग होण्यावरच काँग्रेसचे पुनरुत्थान अवलंबून आहे. 

इंदिराजींचा अहंभाव आणि भयभ्रम : या लेखात इंदिरांची एकंदरीत मानसिकता व्यक्तिमत्वातील अहंपणा आणि त्यावेळी त्यांच्या मनातील भय यांच चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं आहे. त्याच बरोबर इंदिरा आणि मोदी यांच्या व्यक्तिमत्वातील साम्यस्थळे दाखवली आहेत. 

धार्मिक श्रद्धा: ईश्वरी आणि आसुरी : आस्तिक आणि नास्तिक वादाबाबत गांधीजी म्हणतात कोणत्याही धर्माचे स्वरूप दैवी आहे की आसुरी आहे हे ठरविणे, त्या धर्माचा आचार कारणा-यांच्या हाती असते. लेखक म्हणतात मी स्वतःपूर्णपणे नास्तिक नाही , पण मी अज्ञेयवादी आहे ईश्वर आहे की नाही, हे मला माहीत नाही आणि मी अशीही माणसे पाहतो, ज्याची श्रद्धा त्यांना पूर्णपणे निस्वार्थी बनवते.  

अभिव्यक्तीस्वातंत्र्यातील सात  धोके : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा सध्या जोरात आहे. लेखक सात धोके सांगतात १) पुराण, जुने  कायदे  २) न्यायव्यवस्थेतील अपूर्णता ३) पोलिसदलाचे वर्तन ४) आविष्कार स्वातंत्र्याचा जाहीर पुरस्कार न करणे   ५) सरकारी जाहिरातींवरील प्रसारमाध्यमांचे अवलंबन ६) आर्थिक जाहिरातींवरील प्रसारमाध्यमांचे अवलंबन  ७) व्यावसायिक किंवा सैद्धतीक लेखक वर्ग  हे सर्व धोके समजून घेण्यासाठी मूळ लेख वाचणे आवश्यक 

वर म्हटल्याप्रमाणे कालपरवा या पुस्तकातील काही मतमतांतरे पटतील असं नाही पण अधिक प्रगल्भ होण्यासाठी ,. वैचारिक पद्धती विकसती करण्यासाठी असं काही वाचायला हवं 

No comments:

Post a Comment