Thursday 7 December 2023

महानगरांचा धर्म - एकटेपणा

 

खेड्यातून गावात, गावातून शहराकडे, नगराकडे , महानगराकडे सतत  स्थलांतर होत आहे. महानगरातील जीवनमान,  संस्कृतीवर प्रभाव टाकत आहे,बदलत आहे. याची प्रभावी मांडणी.

साप्ताहिक युगांतर दिवाळी अंकात संजीव खांडेकर यांचा “एकट्याचे महानगर : अर्थात पुन्हा गांडू बगीचा” हा अभ्यासपूर्ण लेख आहे. त्यातील काही अवतरणे.

मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती अशी सोपी व व्यापक व्याख्या इरावतीबाई कर्वेंनी केली होती. तर भाषा हीच संस्कृती अशी मांडणी मार्क्सनी केली.

काही दशकांपूर्वी  ८५ महानगरे असलेल्या या जगात गेल्या काही वर्षात ५५० महानगरे निर्माण झाली आहेत. नव भांडवलशाहीची भूक हेच  आपल्या नव संस्कृतीचे मूळ आहे. भूक हा संस्कृतीच्या इतिहासातील पहिल्या काही मैलांच्या दगडा पैकी आहे. परंतु वखवख हा भूकेचा नव अवतार हा महानगरीय संस्कृतीचा पाया आहे.

सारे  देश आता शहरांच्या अमलाखाली आले  आहेत. भांडवलशाही ने शहरांना मध्यवर्ती सत्ता बहाल केली आहे. भांडवलशाहीने  रोखीचे व्यवहार, व्यक्तिगत स्वार्थ या व्यतिरिक्त,  माणसा माणसा  मधील  कोणताही संबंध शिल्लक ठेवला नाही. जीवनाचा दुसरा पैलू म्हणजे “सतत विचलित लक्ष”. मनाचे सतत आणि सातत्याने  स्थलांतर होत असते.

अखंड गोंधळ ,सार्वकालिक अनिश्चितता आणि आंदोलने, गोंधळाची सामाजिक स्थिती हे सर्व, भांडवलशाही युगाला पूर्वीच्या सर्व काळापासून वेगळे करतात.

नव्या गरजांना अंत नाही, आपण रोज नव्या गरजांच्या मागे धावतो. गरजा भागवण्यासाठी सीमापार करून लांब लांब पर्यंत जाण्याचा अट्टाहास मांडतो. असा अट्टाहास हेच जीवनाचे कारण बनू लागते. (reason for livings)

समारंभ, उत्सव, इव्हेटस, पार्ट्या, शॉपिंग, उधळण,झगमगाट, कर्कश संगीत ही आपल्या संस्कृतीची सौंदर्यस्थळे झाली आहेत. प्रत्येक जण जमेल तेवढे रंग उधळत I am happy, you are happy, they are happy, he,she,it is happy असा उदघोष करत नाचत असतो, खिदळत  असतो. सबंध जगच या नवसंस्कृतीच्या जादूने  मुग्ध झाले आहे.  इथले दिवे विझतच नाहीत.

अखंडपणे धावत राहणे एवढाच आणि एवढाच कार्यक्रम सुरु आहे. धावत उठणे, धावत झोपणे, धावत जेवणे, धावत कार्यालयात जाणे, धावत चर्चा करणे, धावत प्रेम, संभोग, खून, बलिदान करण्यापर्यंत किंवा धावतच किंवा धावत धावत मरणे. हा महानगरीय संस्कृतीचा तात्त्विक साचा आहे.

वेग हा महानगरांचा धर्म आहे. वेग अवकाशाचा -हास  करतो. अवकाश सिमटले कि श्वास चिमटतो, श्वास गुदमरला की गती मंद होते. अवकाश अरुंदले की दृष्टीचा कोन संकोचतो. अवकाश आक्रसले की गर्दी वाढते. गर्दी वाढली की कोलाहल वाढतो, कोलाहला च्या कर्कशेत संगीत हरवते. मग शांततेची भीती वाटू लागते. विचार करणे बाजूला पडते. गर्दीत माणसाचा चेहरा हरवतो.  चेहरा हरवला की एकटेपणा वाढतो. एकटेपणातून शेकडो गोष्टी जन्माला येतात.

महानगरांच्या संस्कृतीची मदिरा आणि मधु आपल्या अंगात भिनू लागली आहे.

महानगरीय सांस्कृतिक राजकारणाचे धागेदोरे अभ्यासताना, लेखक काही प्रश्न उपस्थित करतात. आपली भाषा कोणती? कोणाची भाषा आपण बोलतोय, बोलवता धनी कोण? आपल्या भाषेचा घास कोण घेतंय आणि कोणाचा गळा घोटला जातोय? प्रश्नाची उत्तरे जरी मिळाली नाहीत, पण प्रश्न तरी समजून घेता आले पाहिजेत. 

सर्व हलकं फुलकं पाहिजे , डोक्याला शॉट नको म्हणणा-या मंडळीने आवर्जून वाचायला हवा. बुद्धीला खाद्य आणि विचाराला चालना देईल.   

No comments:

Post a Comment