Sunday 25 March 2012

परीक्षणे आणि निरीक्षणे

  
सायनेकर सरांचं तीसरे पुस्तक परीक्षणे आणि निरीक्षणे . पुस्तकाच्या नावावरून  विषय स्पष्ट होतो.  १९८२ ते १९९५ या  कालावधीत सरांनी वृत्तपत्रातून केलेल्या लिखाणाचा संग्रह.  पुस्तकाची सुरवात  वि वा शिरवाडकरांच्या मेकबेथ  मधील अंधार-प्रकश व कुसुमाग्रज या लेखानी  व पुस्तकातील शेवटचा  लेख  ज्ञानेश्वरीच्या  १८ व्या अध्याया वर आहे.  दोन्ही विषय   सरांच्या विशेष आवडीचे.  सर फक्त परीक्षण किंवा   निरीक्षण   नोंदवत नाहीत  तर पुस्तक वाचण्याची, एखाद्या घटनेकडे पाहण्याची दृष्टीही  देतात. विषय समजण्यासाठी आपली पूर्व तयारी काय असावी हे हि सागतात, ज्ञानेश्वरीच्या यथार्थ आकलना साठी श्रद्धा या शक्तीची आत्यंतिक आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरांच्या  शब्दांवर दृढ श्रद्धा ठेवणे हा केवळ त्यांना  अवतारी पुरुष मानण्याच्या परंपरेचा भाग नसून या ग्रंथाच्या   संदर्भातील ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेची ती अटळ पूर्व अट आहे.
रामप्रहर या विजय तेंडूलकर लिखित पुस्तकावर लिहिताना सर वर्तमानपत्रातील यशस्वी स्तंभलेखनाचा मापदंडच  देतात ते लिहितात,वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करणे दुराराध्य कला आहे. विशिष्ट  वेळेचे  आणि शब्द मर्यादेचे बंधन पाळून नियमाने लेखन तर करायचे आणि तरीही तोचतोचपणा अथवा कांटाळवाणेपणा यासारखे अश्या लेखनात शिरणारे दोष टाळायचे हि सोपी गोष्ट नाही. लोकप्रियतेच्या  कसोटीला उतरायचे पण सवंगपणाचा   मोह मात्र दूर ठेवायचा , वाचकांना विचार प्रवृत्त करायचे पण उपदेशकांची   भूमिका  कटाक्षाने  नाकारायची. प्रसन्नता , प्रासादिकता व पृथगात्मता यशस्वी स्तंभलेखनाची  ठळक वैशिष्टे होत. या पुस्तकाची वैशिष्ट उलगडून दाखवतानाच,  तेंडुलकरासारख्या लेखकाने कित्येकदा ओढून ताणून , क्षीण उपरोधाचा आश्रय घेऊन तथाकथित पुरोगामी लेखन केलेच  पाहिजे  का ? असा प्रश्न उपस्थित  करतात. 
जी ए कुलकर्णी यांच्या लेखनाची महत्ता वर्णन करताना सर लिहितात जी ए च्या कथेत आपले लक्ष सर्वात अधिक वेधले जाते ते तिच्यातील  आशयघनतेकडे. माणसाची नियतीशरणता, पदोपदी क्षणोक्षणी त्याला जाणवणारा परावलंबीपणा , विश्वाच्या  विराट पसा-यात  त्याचे नगण्यत्वं, समाजात व कुटुबातही जाणवणारा निरांलबी एकलेपणा, प्रयत्न , पुरुषार्थ   इत्यादी  कल्पनांचा फोलपणा, जगण्याच्या एकूण प्रक्रीय्लाच अर्थशून्य करून टाकणारा मृत्यू, या सारखे सारे जीवन ढवळून काढणा-या अनुभवांचा शोध जी ए  सतत घेतात. 
मनुस्मृती- काही विचार या नरहर कुरुंदकराच्या पुस्तकातील अनेक मुद्दे व विचार अत्यंत विवाद्य स्वरूपाचे आहेत असे सर स्पष्ट पणे मांडतात. व काही प्रश्न  उपस्थित करतात. डॉ.आंबेडकर यानाही मनुस्मृतीत  न आढळलेले दोष कुरुंदकराना मात्र स्पष्टपणे दिसू लागतात हे त्याच्या विद्वत्तेमूळे घडते कि पूर्वग्रहामुळे?  सर्व दोषाचे संमेलन असणारा एखादा ग्रंथ १६०० वर्षे टिकून राहतो आणि सा-या परंपरांचा आधारवड कसा ठरतो? वैचारिकता व प्रदीर्घ व्यासंग या दोन्ही गुणांनी पुस्तक ओतप्रोत भरलेले असले  तरी दुर्दैवाने या पुस्तकातील व्याज व्यासंगाने त्याचे मुल्य काहीसे उणावते.
या संग्रहातील अरुण टिकेकर , व्यंकटेश माडगुळकर यांच्या ग्रंथावरील लेख सुंदर झाले आहेत ते  मुळापासून वाचायला हवेत. साहित्याविषयी आपली जाण वाढविणारे व भान देणारे पुस्तक. सरांच्या दुस-या पुस्तकाविषयी पुन्हा कधीतरी.

No comments:

Post a Comment